Leave a comment

दहशतवादाचा माहितीकोश

दहशतवादाविषयीच्या माहितीसागरात नेटवर गटांगळ्या खाऊ लागलात आणि दिशा सापडेनाशी झाली तर या तराफ्याचा आधार तुम्हाला नक्कीच वाटेल. या वेबसाईटचे संपादक आहेत के.पी.एस. गिल!
दहशतवाद हा विषय गेली कित्येक वर्षे जागतिक चव्हाटय़ावर चर्चिला जातो आहे. २६ नोव्हेंबरला मुंबईवर जे दहशतवादी हल्ले झाले त्यामुळे जागतिक राजकारण ढवळून निघाले आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि दहशतवादापासून संरक्षण या आता खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या चार किमान गरजा बनल्या आहेत.
ज्या वेळी दहशतवादी हल्ला होतो त्या वेळी आणि पुढले काही दिवस हा विषय कमालीचा चर्चेत राहतो. पुढे काही दिवसांनी वातावरण शांत झाले की हळूहळू तो विषय पडद्याआड जाऊ लागतो. संसदेवर झालेला हल्ला आठवा. संपूर्ण राष्ट्र त्याने ढवळून निघालं. पण नंतर तो विषय मागे पडला. मग वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोटांच्या मालिका झाल्या. पुन्हा ते सारं विसरून लोक कामाला लागले. मुंबईवर झालेल्या हल्ल्याने मात्र सर्वच जण हादरले. आता जो तो दहशतवादाविषयीची माहिती कुठे वाचायला मिळाली की विशेष जिव्हाळ्याने ती वाचतोय. त्यावर चर्चा करतोय. हे सारं अगदी मनापासून होतंय. कारण सामान्य माणूस आता हे गृहीत धरून चालू लागला आहे की जी पथ्ये, औषधपाणी आणि उपचार घेत तो आपला जीव वाचवत आला, तो जीव एका गोळीने केव्हाही जाऊ शकतो.
दहशतवादावर वर्तमानपत्रातून खूप लिहिलं जातंय. पण ते सारं तात्कालिक असतं. संसदेवर झालेल्या हल्ल्याची बातमी देणारं वृत्तपत्र आज शोधायचं झालं तर सहजासहजी ते मिळू शकेल का? अशा वेळी संदर्भासाठी हमखास कामी येतं ते इंटरनेट. पण इंटरनेटवरही ते सारे संदर्भ एका जागी मिळणं दुरापास्त असतं. गुगलवर

खूप वेळ शोधावं, पुन:पुन्हा शोधावं म्हणजे मग त्यातलं काही हाती येतं. या शोधण्यात खूप वेळ आणि शक्ती खर्ची होते. अशा वेळी स्वाभाविकच मनात विचार येतो की दहशतवादासारख्या विषयाची सर्वागीण माहिती एका जागी उपलब्ध करणारी एखादी वेबसाइट कोणती? र्सवकषता आणि अद्ययावतता या दोन बाबींची पूर्तता करणारी वेबसाइट हवी, आणि त्या दोन बाबींपेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे त्या साइटची विश्वासार्हता. चुकीची व अपुरी माहिती देणारी वेबसाइट असेल तर ती दहशतवादाइतकीच धोकादायक ठरेल.
आणखी एक मुद्दा म्हणजे आपण भारतीय पॅलेस्टाईन- इस्रायलमधील किंवा ब्राझील- मेक्सिकोमधील दहशतवादापेक्षा अधिक संबंधित असतो ते पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि खुद्द आपल्या देशातील दहशतवादाशी. त्यामुळे आपल्याशी संबंधित दहशतवादाशी संबंधित र्सवकष, अद्ययावत आणि विश्वासार्ह अशी वेबसाईट ही या संदर्भातील आपली गरज आहे. हे सगळे निकष भागवणारी, मला नोंद घ्यावीशी वाटणारी वेबसाईट म्हणजे http://www.satp.org/
SATP म्हणजे South Asian Terrorism Portal. या संदर्भात नोंद घेण्यासारख्या दोन गोष्टी. एक म्हणजे ही वेबसाईट .orgप्रकारची म्हणजे कोणत्या तरी संस्थेची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही वेबसाईट ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या सामाजिक संस्थेची आहे. त्या संस्थेचे नाव आहे Institute for Conflict Management. ही एक नोंदणीकृत आणि मुख्य म्हणजे भारतीय संस्था आहे. पंजाबात पोलीस दलाचे प्रमुख म्हणून गाजलेले के.पी.एस. गिल हे निवृत्त आय.पी.एस. अधिकारी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. या संस्थेतर्फे दहशतवादाची माहिती देणारं Faultlines नावाचं एक नियतकालिक प्रकाशित होतं. त्याचे संपादक के.पी.एस. गिल हे आहेत. दहशतवाद हा विषय जाणणारा गिल यांच्यासारखा ज्येष्ठ व अनुभवी माणूस ज्या संस्थेचा अध्यक्ष व संस्थेच्या नियतकालिकाचा संपादक आहे, अशी वेबसाईट आपण निश्चितच विश्वासार्ह मानू शकतो.
satp.org मध्ये फक्त दक्षिण आशियाचा विचार होत असल्याने त्यात फक्त भारत, पाकिस्तान, बांगला देश, भूतान, नेपाळ व श्रीलंका हे देश अंतर्भूत होतात. मूळ भारतीय संस्था असल्याने भारताचा विचार त्यात पूर्ण विस्ताराने होणार हे ओघानेच आले. स्वाभाविकच जम्मू-काश्मीर, आसाम, मणीपूर, त्रिपुरा, मिझोराम, नागालँड, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश व पंजाब या राज्यांची दहशतवादाशी संबंधित सविस्तर पाश्र्वभूमी आपल्याला इथे एकत्र मिळते. या माहितीशी संबंधित तज्ज्ञांचे शेकडो लेख, आकडेवारीचे रकाने, टाईमलाईन म्हणजे घडलेल्या घटनांचा कालानुरूप क्रमाचा तपशील वगैरे त्यात उपलब्ध करण्यात आला आहे. 
या वेबसाईटवरील लिंक्सची ही शीर्षके पहा – Backgrounder, Assessment, Data Sheets, Timelines, Documents, Bibliography, Terrorist Groups, Maps वगैरे. या शीर्षकांवरून आत काय असेल याची आपल्याला कल्पना येते. याशिवाय Terrorism Update या सदरामध्ये आपल्याला दैनंदिन स्तरावर घडणाऱ्या दहशतवादी घटनांची वृत्ते उपलब्ध होतात.
यातला पाकिस्तानचा विभाग भरगच्च माहितीने युक्त आहे. नवाझ शरीफ यांनी १२ जुलै १९९९ रोजी पाकिस्तानच्या जनतेला उद्देशून जे भाषण केले होते, त्यापासून ते अगदी अलीकडील राष्ट्राध्यक्ष झरदारी यांच्या भाषणांपर्यंतचा शब्दश: तपशील पाकिस्तान डाक्युमेंटस्मध्ये वाचायला मिळतो. 
१९९९ साली नवाझ शरीफ जे म्हणाले होते आणि आज २००८ मध्ये झरदारी आणि गिलानी जे म्हणत आहेत त्यात प्रचंड साम्य आहे. अगदी अभ्यास म्हणून नाही तरी ‘युद्धस्य कथा रम्या:’ म्हणतात त्या न्यायानं ही सारी माहिती जरूर वाचावी. अशा प्रकारच्या माहितीचा प्रचंड साठा या वेबसाईटवर आहे.
थोडक्यात दहशतवादाचा विषय जेव्हा जेव्हा येईल, त्या त्या वेळी satp.org ही साईट आपल्या मदतीला येईल. या विषयासाठी केवळ या एकाच वेबसाईटवर अवलंबून राहावं असं मी अर्थातच म्हणणार नाही. पण या संदर्भात इंटरनेटवर माहितीचा जो सागर आहे, त्या सागरातला हा एक उपयुक्त तराफा मात्र नक्कीच आहे. दहशतवादाविषयीच्या माहितीसागरात नेटवर गटांगळ्या खाऊ लागलात आणि दिशा सापडेनाशी झाली तर या तराफ्याचा आधार तुम्हाला नक्कीच वाटेल.

माधव शिरवळकर

mshirvalkar@gmail.com

 

लेख संकलन :-माझी मराठी  , संपर्क :- माझी दुनिया 

Advertisements

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: